जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील निंभोरा येथे मजुरी करणारा तरुण हा सुटीनंतर घरून कामावर जात असताना रावेर तालुक्यातील खानापूर गावाजवळ त्याला भरधाव अज्ञात वाहनाने मंगळवारी २१ मे रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास जबर धडक दिली. या धडकेत त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.
सुमेर मालसिंग कणसे (वय ३०, रा. मांडवा ता. नेपानगर जि. बऱ्हाणपूर, ह. मु. निंभोरा ता. रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो मांडवा येथे आई, वडील, पत्नी, १ मुलगा, ३ मुली यांच्यासह राहत होता. निंभोरा येथे एका व्यापाऱ्याकडे मजुरी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, तो काही दिवसांपूर्वी सुटीवर आला होता. सुटी आटोपून तो मंगळवारी दि. २१ मे रोजी पहाटे कामावर जाण्यासाठी निघाला होता. खानापूर गावाजवळ आला असता त्याला भरधाव वाहनाने जबर धडक दिली. धडकेत तो गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे.
त्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुमेरच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी आक्रोश केला. शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद होऊन खानापूर दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.