यावल प्रतिनिधी । शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच अनेक परिसरातील भागामध्ये मोकाट गायी, म्हशी, बकऱ्या आणि कुत्रे यांच्या वावर अधिक वाढला आहे. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार केली. मात्र नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. परिसरातील मोकाट जनावरांवर अंकुश लावण्याची जबाबदारी कुणावर आहे, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्ग हे शहरातून गेले असुन, या मार्गावरील बुरूज चौक, भुसावळ टी पॉईंट चौक, बस स्टॅंड समोरील परिसर या क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासुन या वर्दळीच्या मार्गावर मोकाट गुरांचा गोंधळ वाढल्याने पादचाऱ्यांपासुन तर वाहनधारकांना या गुराढोरांच्या मोकाट संचारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याप्रसंगी या गुरांच्या गोंधळामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. तर अनेक वेळा गुरांच्या गोंधळात दुचाकी वाहनधारकांचे अपघात देखील होत आहेत. नगर परिषद प्रशासनाच्या या दुर्लक्षीत व भोंगळ कारभारामुळे वारंवार मोकाट गुरांचे बंदोबस्त लावण्या संदर्भात प्रसार माध्यमापासून तर अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांच्या तक्रारी जावुन देखील नगर परिषद प्रशासन या नागरीकांच्या गंभीर समस्याकडे लक्ष देत नसल्याने प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गुराढोरांच्या या मोकाट गोंधळामूळे काही अप्रिय घटना होवु नये, याची काळजी नगर परिषद प्रशासनाने घ्यावी. अशी विनंती परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.