राष्ट्रावादीत राहून जनतेची कामे करता आली नाहीत : उदयनराजे

download 1 2

सातारा, प्रतिनिधी | राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजापात प्रवेश केल्यानंतरही आपण आपल्या भूमिकांवर ठाम राहणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय इतके वर्षे राष्ट्रावादीत राहून जनतेची काहीच कामे करता आली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच अनेकांनी मला निवडणुकीत पाडण्यासाठी प्रयत्न केले असल्याचाही आरोप करीत त्यांनी भाजपा प्रवेशाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

 

उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रावादीच्या गोटातून त्यांच्यावर टीका केल्या जात आहे. या टीकाकारांचाही उदयनराजेंनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपा प्रवेश का केला नाही? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, एक शेवटची संधी देऊन बघावी असे मला तेव्हा वाटले होते. पहिल्या, दुसऱ्या निवडणुकीत जे मताधिक्य मिळाले होते, वाटले होते यंदा त्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. पण मताधिक्य लांबच राहिले मात्र घसरण एवढी झाली की, नैतिकदृष्ट्या जर मला विचारले तर निवडून जरी आलो असलो तरीपण मी हे समजतो की, हा माझा पराभवच झाला आहे. मग अशा लोकांबरोबर दिवस काढायचे तरी किती ? प्रत्येकवेळी तेच अनुभव, आयुष्याचे १५ वर्षे म्हणजे थोडा काळ नाही.

सत्तेत असतानाही त्यांनी काही केले नाही, मात्र तरीही मी सोबत होतो. मात्र माझा पराभव होईल यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नव्हते. मला खोटे कधीच सहन होत नाही, लोकांच्या हिता विरोधात काही होत असेल आणि प्रगतीच्या आड जर कोणी येत असेल, तर मी उघडपणे माझे मत व्यक्त करतो. हा माझा स्वभाव आहे आणि मग तो कुणाला आवडो अथवा न आवडो याचे मला काहीही देणे-घेणे नाही, असे स्पष्टपणे सांगत, यावेळी त्यांनी इतक्या वर्षांमध्ये माझे एकही काम झाले नसल्याचे बोलून दाखवले.

राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवारांबाबत बोलताना ते म्हणाले की, या सर्व तक्रारी त्यांच्या कानावरीही अनेकदा घातल्या आहेत. त्यांचा मी वैयक्तिक आदरही करतो, माझे त्यांचे संबंधही चांगले आहेत. पण शेवटी जनतेला उत्तर द्यायची आहेत. जनता ही विकासाच्या बाजूनेच कौल देणार आहे, त्यामुळे जनतेला मला काय केले हेच दाखवावे लागणार, असे त्यांनी सांगितले. तसेच, सोशल मिडीयावरील चर्चांना मी फारसे गांभिर्याने घेत नाही, मी जे केले, ते माझ्या विचाराने केले असेही ते यावेळी म्हणाले.

Protected Content