यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी दुर्गम क्षेत्रातील डोंगरदे या गावातील आदिवासी वस्तीवर सभागृहाचे काम अत्यंत निकृष्ठ प्रतिचे होत असल्याची तक्रार आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात आदीवासी तडवी भिल्ल एकता मंच, यावल तालुका शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या दिलेल्या लेखी तक्रार निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे या पाडयावर शंभर टक्के आदीवासी बांधवांचे कुटुंब वास्तव्यास राहातात. या आदिवासी बांधवांच्या विकासाकरिता शासनाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मिळत असते. मात्र स्थानिक प्रशासनाच्या ढीसाळ व दुर्लक्षित कारभारामुळे निधीच्या माध्यमातुन होत असलेली कामे ही अत्यंत निकृष्ठ व गुणवत्ते अनुसार होत नसल्याचे दिसुन येत आहे. डोंगरदे या आदीवासी पाडयावर गेल्या काही दिवसांपासुन आदीवासी बांधवांसाठी सभागृहाचे काम हे प्रगती पथावर आहे. सदरचे काम हे संबंधीत ठेकेदाराकडुन शासनाच्या अंदाज पत्रकानुसार होत नसल्याचे दिसत असून या लाखो रुपये खर्चाच्या या सभागृहाच्या कामात ठेकेदाराने फुटींग, खोदकाम, पी.सी.सी. बिम कॉलम व प्लास्टर हे निविदा प्रमाणे केलेले नाही. येणारा काळात हे निकृष्ठ प्रतिने तयार केलेले सभागृह हे कोसळल्यास याचे गंभीर परिणाम आदीवासी बांधवांना भोगावे लागतील, याची नोंद अत्यंत गरजेचे आहे.
सदरच्या या कामात संबंधीत अभियंता, ठेकेदार, डोंगर कठोरा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक यांच्या संगनमताने आर्थिक स्वार्थाला बळी पडुन अशा प्रकारची निकृष्ठ प्रतिची कामे केली जात आहे. शासकीम निधीचा अशा प्रकारे संगनमताने दुरुपयोग करणाऱ्या ठेकेदाराची व त्यास सहकार्य करणाऱ्या शासकिय यंत्रणेची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, जेणे करून गरिब आदीवासी पाडया वस्तींवर शासकीय निधीतुन होणारे विकास कामेही चांगल्या प्रतिचे होतील. अशी मागणी आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या आर.ई. तडवी व त्यांचे तालुका शाखाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे.