डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात व्हाइट कोट समारंभ उत्साहात


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट व डीन अॅड्रेस समारंभ शनिवारी अत्यंत उत्साहात पार पडला. या समारंभातून विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवासाचा औपचारिक आणि प्रेरणादायी प्रारंभ झाला.

डॉ. केतकी पाटील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील यांची उपस्थिती लाभली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत साळुंके, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे रजिस्ट्रार चेतन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समारंभाच्या सुरुवातीला माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते आरोग्यदेवता धन्वंतरीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्हाइट कोट परिधान करून गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले. हा क्षण विद्यार्थ्यांसाठी अभिमानाचा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला.

मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, व्हाइट कोट समारंभ हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या करिअरमधील नवा अध्याय सुरू करणारा महत्त्वाचा टप्पा आहे. आयुर्वेदिक शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात उच्च दर्जाची गुणवत्ता राखत समाजाला उत्तम आयुर्वेदाचार्य देणे हे महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुर्वेद हा प्राचीन काळापासून अखंड भारताचा कणा असून आधुनिक काळातही त्याचे महत्त्व अधिक वाढत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासून आयुर्वेदाच्या ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड द्यावी, समाजसेवेला प्राधान्य देत आपल्या कार्यातून विश्वास निर्माण करावा आणि या क्षेत्रात उज्ज्वल नाव कमवावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या. समारंभात विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वासाचे वातावरण दिसून आले.