मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिट्टी चिन्ह बहुजन विकास आघाडीला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायलयाने सोमवारी सकाळी दिला. यामुळे पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शिट्टी चिन्ह परत मिळाल्याने जल्लोष साजरा केला. पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार असून पक्षाचे ‘शिट्टी’’ हे पारंपरिक चिन्ह आहे.
निवडणूक आयोगाने ३० जानेवारी २०२४ रोजी ‘शिट्टी’ हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव ठेवले होते. मात्र त्यानंतर २३ मार्च २०२४ रोजी भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या नवीन अधिसूचनेत ‘शिट्टी’ हे चिन्ह मुक्त चिन्हांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे अनेक अपक्ष उमेदवारांनी ‘शिट्टी’ या चिन्हाची मागणी केली होती. निवडणूक आयोगाच्या दोन निर्णयामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता आणि बविआच्या हातून शिट्टी निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती.
बविआने न्यायालयात धाव घेतली असताना पक्षासाठी आणखी एक दिलासादायक बाब घडली होती. जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय सचिव मोहम्मद निसार यांनी रविवार ३ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नसल्याने शिट्टी चिन्ह परत करणार असल्याचे सांगितले होते. हे पत्र बविआसाठी महत्वपूर्ण ठरले. सोमवारी ४ नोव्हेंबर ( दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने या विषयाचे गांभीर्य पाहून उच्च न्यायालयाने सोमवारी सकाळी तातडीने या याचिकेची सुनावणी घेतली. या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि सोमशेखर सुंदरसन यांच्या खंडपिठाने शिट्टी चिन्ह बविआला देण्याची पूर्तता करण्याचा आदेश दिला. भारत निवडणूक आयोगातर्फे हजर वकिलांनी बविआने शिट्टी हे चिन्ह मागितल्याने कायद्याच्या कक्षात राहून त्यांना देण्यात येईल असे न्यायलयाला सांगितले.