जामनेर, प्रतिनिधी | पाणी फांऊंडेशन संचलित ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ च्या स्पर्धेत तालुक्यातील चिंचोली-पिंप्री गावाला कामाच्या गुणवत्तेनुसार राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे अपेक्षित असताना केवळ तालुकास्तरीय पुरस्कार मिळाल्याने तेथील ग्रामस्थांनी पक्षपाताचा आरोप करीत हा पुरस्कार परत केला आहे.
चिंचोली-पिंप्री ग्रामस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेवुन जलसंधारणाची कामे चांगल्या रितीने पुर्ण करून गावाची ओळख निर्माण केली होती. मात्र गावाला केवळ तालुक्यातील प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. पाणी फांऊंडेशनच्या तज्ञांच्या मते चिंचोली पिंप्री गावाचे स्पर्धेतील काम पाहता गुणवत्तापुर्वक असून गावाला राज्यातील प्रथम तीन गावांमध्ये पुरस्कार मिळणे अपेक्षित असल्याचे मत ग्रामस्थांजवळ बोलून दाखवत विश्वास व्यक्त केला होता. तसेच जर चिंचोली पिंप्री गावाचे स्पर्धेतील काम समाधान कारक नव्हते तर सबंधित गावातील कामाचे ८० टक्के चित्रीकरण प्रसिध्दीसाठी का दाखविले व राज्य स्तरावर ज्या गावांना पुरस्कार मिळाला त्यांचे चित्रीकरण का दाखविले नाही ? असा सवाल ग्रामस्थांनी यावेळी केला आहे.
राज्यस्तरावरील प्रथम तीन पुरस्कारांसाठी गावाची योग्यता असताना पाणी फांऊंडेशनने पुरस्कार देताना पक्षपात केला असल्याचा आरोप करत सदर पुरस्कार ग्रामस्थांनी परत करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. आज (दि.१४) येथील तहसीलदार टिळेकर यांच्याकडे पुरस्कार सुपुर्द केला आहे. यावेळी चिंचोली पिप्रींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या सख्यंने उपस्थित होते.