
जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमधील नऊ प्रभागांसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला असून, सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावत लोकशाहीचा हक्क बजावला आहे.

सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद असला तरी दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढताना दिसून आली. प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक यंत्रणेकडून सतत लक्ष ठेवले जात आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्हाभरात सरासरी ४६.५३ टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. यामध्ये वरणगाव नगरपरिषदेत ४९.६९ टक्के, पाचोरा येथे ४६.९९ टक्के, भुसावळ येथे तुलनेने कमी म्हणजेच ३२.८४ टक्के मतदान झाले आहे. अमळनेर नगरपरिषदेत ४६.५० टक्के, सावदा येथे ५७.५६ टक्के तर यावल नगरपरिषदेत सर्वाधिक ६७.३६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा मतदानासाठी मोठा सहभाग पाहायला मिळत असून, युवा मतदारांनीही उत्साहाने मतदान केले आहे. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच उमेदवार मतदारांना मतदानासाठी आवाहन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सायंकाळी मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज असून, निकालाबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची दिशा ठरविणारे हे मतदान महत्त्वाचे मानले जात आहे.



