मतदार यादीत मृत दाखविल्याने मतदारांनी काढली स्वत:चीच अंत्ययात्रा (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 04 23 at 6.33.18 PM

भुसावळ (प्रतिनिधी ) मलकापूर येथे मतदान केंद्रावर चक्क जिवंत मतदारांना मृत दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर मतदान केंद्रावर मृत दाखविलेल्यांनी  स्वत:ची अंत्ययात्रा  काढली…ही अंत्ययात्रा  मतदान केंद्रावरून उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयावर नेण्यात आली. ही अंत्ययात्रा संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली असून या प्रकाराने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे…

 

आज 23 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकिचे मतदान तिसऱ्या टप्प्यात होत असून रावेर मतदार संघात असलेल्या मलकापूर विधानसभा मतदार संघात असलेल्या बुथ क्रमांक १६६  वर रोहिदास नगर मधील मतदार क्रमांक ५२१ श्रीकृष्ण संपत शेकोकार,मतदार क्रं. ६४० मोहनसिंग चिंधु गणबास, दत्तनगर मधील मतदार क्रमांक ४४३ सौ.रजनी दिनकर जोशी यांसह जवळपास पन्नास जिवंत मतदारांना चक्क मृत दाखविल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी विंचनकर यांचेशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, गजानन ठोसर, नगरसेवक राजु पाटील, अनिल बगाडे, अनिल गांधी यांच्या नेतृत्वात किशोर गणबास, अंकुश भोंबे, सुनिल बगाडे, गोपाल कावस्कर, भावसिंग धामोणे, नितीन परसे ,विजय खिराडे, गोपाळ पठ्ठे, दिलीप काकडे(डि.के), मंगल गणबास,बुथ क्रमांक१६६ वरुन सहाय्यक निवडणूक अधिकारी(एस.डी.ओ)कार्यालयावर डफडे वाजवून अंत्ययात्रा  उपविभागीय अधिकारी कार्यालयावय काढण्यात आली. अंत्ययात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकताच उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे, शहर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पोलीस ताफ्यासह दाखल झाले. नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी जिवंत असलेल्या व्यक्तीला निवडणूक यादीत डिलीटेट दाखविल्याने तो मतदानापासुन वंचित राहत असल्याने मतदार याद्या अद्यावत करुन  ‘त्या’  बुथवर पुर्नमतदान घेण्याची मागणी केली. प्रेतयात्रा काढणाऱ्यांना पोलीसांनी अटक केली आहे.

Add Comment

Protected Content