यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात भक्तीमय वातावरणात आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या त्रयोदशी निमित्त मंगळवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेषतः, महानुभाव पंथीय बांधवांनी त्रयोदशीच्या दिवशी हा उत्सव महेलखेडी, कोरपावली, मोहराळा, डोंगर कठोरा आणि यावल शहर अशा पाच गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने श्री विठ्ठल-रुक्माई मंदिरे आणि श्री दत्त मंदिरांमध्ये पूजा-अर्चा व फराळ वाटपाचे कार्यक्रम पार पडले. महानुभाव पंथीय पौर्णिमेपर्यंत आषाढी एकादशीचा हा उत्सव जिल्हाभरात साजरा करतात.
आजच्या त्रयोदशीला यावल तालुक्यातील पाचही गावांमध्ये अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने दिवसभरात सहा ते सात हजार भाविकांनी दर्शन घेतले आणि हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. जळगाव जिल्ह्यातून विविध ठिकाणांहून भाविक या कार्यक्रमांसाठी उपस्थित होते.

या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, महानुभाव पंथीय बांधव ग्रंथवाचन करतात आणि श्री दत्त मंदिरांमध्ये पुजाऱ्याच्या माध्यमातून विधीवत पूजा-अर्चा पार पाडतात. यासाठी सर्व भाविक परिश्रम घेऊन अन्नदानाच्या कार्यक्रमात सहभागी होतात. महेलखेडी येथे मधुसूदन शास्त्री तर कोरपावली येथे परशुदास बाबा हे श्री दत्त मंदिराचे पूजा-अर्चेचे कार्य करतात आणि भाविकांना मार्गदर्शन करतात.
आषाढी एकादशीचा हा उत्सव केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून, तो सामाजिक एकोपा आणि अन्नदान यासारख्या विधायक कार्यांनाही प्रोत्साहन देतो.



