चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील एका ६० वर्षीय वृध्दवर मध्यरात्री धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ४ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेहुणबारे पोलीसांनी दोन भावांना ताब्यात घेतले असून एक अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
अशी आहे घटना
याबाबत अधिक असे की, चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील अशोक रघुनाथ गायकवाड (वय-६०) यांच्यावर ४ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या वेळेस दोन अनोळखी संशयित आरोपींनी धारदार शस्त्रांनी क्रूरपणे हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात त्यांचा डावा हात कापला गेला असून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करून सागर राजू गायकवाड (वय 24) याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, हा गुन्हा त्याच्या अल्पवयीन भावासोबत केल्याचे उघड झाले. अल्पवयीन आरोपीला अभिरक्षा गृहात दाखल करण्यात आले आहे.
आरोपींनी वापरलेल्या तलवारी आणि चाकू तपासादरम्यान हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. यामध्ये पोहेकॉ गोकुळ सोनवणे, दिनेश पाटील, किशोर पाटील, शांताराम पवार यांचा विशेष सहभाग होता. पोलीस विभागाच्या तात्काळ कारवाईमुळे गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले असून, या कामगिरीचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.