जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “नको नको रे ज्योतिषा हात माझा पाहू…” अशा सहज ओळींमधून जगण्याचे तत्वज्ञान सांगणाऱ्या खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १४५ वी जयंती जळगावच्या बहिणाई स्मृती संग्रहालयात अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. त्यांचे साहित्य म्हणजे ग्रामीण जीवनाचा आरसा असून त्यांच्या ओव्यांमध्ये दडलेले अध्यात्म आणि व्यवहारशास्त्र आजही नव्या पिढीला दिशा देणारे ठरत आहे, असे प्रतिपादन कवि किरण डोंगरदिवे यांनी केले.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बहिणाईंचे भावविश्व” या विशेष कार्यक्रमात बहिणाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाण्याचे कवि किरण डोंगरदिवे यांनी बहिणाबाईंच्या साहित्याचे विश्लेषण करताना म्हटले की, “बहिणाबाईंच्या ओव्यांमागे ज्ञानपीठ, साहित्य अकादमी हे सारे पुरस्कार फिके वाटावेत. त्यांच्या कवितांचा ‘लोक पुरस्कार’ म्हणजेच त्यांचे खरे यश आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, वाचनसंस्कृती वाढली पाहिजे आणि बहिणाईंचे साहित्य शाळांमधून नव्या पिढीपर्यंत पोहचवले पाहिजे. येणाऱ्या पाच वर्षांत त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने शाळांमध्ये ‘संतवाणी आणि बहिणाईंची गाणी’ या विषयावर विशेष कार्यक्रम घ्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात कवयित्री रेणुका पुरोहित (पुणे) यांनी आपल्या मनोगतातून बहिणाबाईंच्या साहित्यातील माणुसकी आणि शहाणपण यावर प्रकाश टाकला. “शिक्षण फक्त शाळेत मिळत नाही, आई-वडील, शेती आणि माती हेही शिक्षकच असतात. बहिणाबाईंच्या कवितांमधून आपल्याला जगण्याचे भान येते,” असे त्या म्हणाल्या. बहिणाबाईंच्या पणतसून पद्माबाई चौधरी, स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, अशोक चौधरी, कांचन खडके आणि अन्य मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विद्यार्थिनी जयश्री मिस्त्री यांनी “अरे संसार संसार” या बहिणाईंच्या सुप्रसिद्ध रचनेने केली. प्रास्ताविक विजय जैन यांनी करताना श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संवेदनशीलतेमुळे हा ट्रस्ट उभा राहिल्याचे सांगितले. भारती कुलकर्णी यांनी बहिणाबाईंच्या परिसरातील आठवणींना उजाळा दिला आणि काही ओव्या सादर केल्या.
ज. सू. खडके विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी रामपेठ चौधरी वाड्याच्या अनेक महिला व नागरिकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र पाटील, जितेंद्र झंवर, प्रदीप पाटील, दिनेश थोरवे, राजेंद्र माळी, समाधान महाजन, शरद धनगर आदींनी विशेष प्रयत्न केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी अतिथींचा परिचय करून दिला आणि सूत्रसंचालन किशोर कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमातून बहिणाबाईंच्या साहित्याचा गहिरा प्रभाव आणि त्यांचे सामाजिक योगदान पुन्हा एकदा समाजासमोर आले. त्यांच्या ओव्यांतून समृद्ध होणाऱ्या वाचनसंस्कृतीची गरज अधोरेखित करण्यात आली. बहिणाबाई केवळ कवयित्री नसून त्या जनसाहित्याच्या गाभ्याचा आत्मा आहेत, हे या कार्यक्रमातून ठळकपणे समोर आले.



