यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवा दरम्यान १९२ वर्षांची परंपरा असलेल्या बारगाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला यंदा मोठा धक्का बसला. ग्रामस्थांच्या निरुत्साहामुळे केवळ ३० जणांनीच या परंपरेत सहभाग नोंदवला, ज्यामुळे हा उत्सव चर्चेचा विषय ठरला आहे.
डोंगर कठोरा येथे महान जादूगार सोमबुवा यांच्या अद्भुत जादूतून साकारलेल्या बारगाड्या यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य मानल्या जातात. दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी, धूलिवंदनच्या निमित्ताने खंडेराव महाराज यात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, यंदा ग्रामस्थांचा उत्साह ओसरल्याचे स्पष्ट दिसून आले. दरवर्षी तुडुंब भरलेल्या बारगाड्यांवर यावर्षी केवळ ३० जणांचा सहभाग होता, हे विशेष! १९२ वर्षांची परंपरा अचानक कमकुवत होण्याची अनेक कारणे ग्रामस्थांमध्ये चर्चिली जात आहेत. सामाजिक सलोख्याचा अभाव, बदलती जीवनशैली आणि नव्या पिढीचा सहभाग कमी होणे ही काही संभाव्य कारणे मानली जात आहेत.
या सोहळ्यात सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनराज पाटील, ग्रामपंचायत अधिकारी ए.टी. बगाडे, तलाठी गजानन पाटील, पोलिस पाटील राजरत्न आढाळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि खंडेराव महाराज मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. डोंगर कठोरा यात्रोत्सवाच्या परंपरेला पुन्हा पूर्वीचा उत्साह मिळेल का? की हा बदल कायमस्वरूपी असेल? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.