जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आज शिगेला पोहोचला होता. भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) येथे आयोजित युवतींच्या दहीहंडी उत्सवाने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. रोप मल्लखांब, चित्तथरारक कसरती आणि सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमांनी या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला, तर शौर्यवीर, पेशवा, वज्रनाद या तीन ढोलपथकांतील तब्बल ४१५ वादकांनी पुणेरी ढोलांच्या गजरात परिसर दणाणून सोडला.
गेल्या १७ वर्षांपासून महाराष्ट्रात एकमेव असलेला हा युवतींचा दहीहंडी उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्याप्रसंगी मुख्य व्यासपीठासह तीन अन्य व्यासपीठांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. यंदा प्रथमच ११ युवतींच्या संघातून सुमारे ५०० गोपिकांनी या दहीहंडी पथकात सहभाग घेतला. किडस् गुरूकुल शाळा, नूतन मराठा महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, ॲड एस. ए. बाहेती महाविद्यालय, के.सी.ई. सोसायटी मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, के. के. इन्स्टीट्यूट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल, आर. आर. शाळा आणि एन.सी.सी. यांसारख्या विविध संस्थांमधील युवती पथके यात सहभागी झाली होती.

या जल्लोषपूर्ण वातावरणात गोपिकांचे मानवी मनोरे जळगावकरांचे लक्ष वेधून घेत होते. अखेर, हरिजन कन्या छात्रालय या गोपिकांच्या पथकाने चित्तथरारक मनोरा रचत उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पारितोषिकाने गौरविण्यात आले. यासोबतच इतर सहभागी झालेल्या संघांनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ऐश्वर्या रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, अग्रणी बँकेचे सुनील दोहरे, माजी महापौर विष्णू भंगाळे, जेडीसीसी बँकचे संचालक अरविंद देशमुख, गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, युवतींच्या दहीहंडी समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी नागूलकर, प्रा. शमा सराफ, नीलम जोशी, अनिता पाटील, यामिनी कुळकर्णी, सोनाली महाजन, चेतना नन्नवरे, लीना पवार, डॉ. हेमांक्षी वानखेडे, श्रिया कोकटा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीला दहीहंडी पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले. छाया बोरसे, मंजुषा भिडे, कामिनी धांडे, छाया चिरमाडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यंदाचा उत्सव पाहण्यासाठी जळगावकरांनी प्रचंड गर्दी करून गोपिकांचा उत्साह वाढवला, ज्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.



