जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रवचनासाठी गेलेले रामानंद नगर येथे राहणाऱ्या वृध्द महिलेचे बंद घर फोडून घरातून सोने चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली होती. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील चोरटल्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथून अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. साहिल प्रवीण झाल्टे उर्फ साहिल शेख रा. पवन नगर धुळे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, रामानंदनगर येथे राहणाऱ्या वृध्द महिला वनिता जगन्नाथ चौधरी ह्या ६ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास प्रवचनासाठी घर बंद करून गेल्या होत्या. याचा फायदा घेत चोरट्याने बंद कर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याच्या शोध घेत असताना संशयित आरोपी हा धुळे येथील पवन नगरातील रहिवाशी असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार रवी नरवाडे, विजयसिंह पाटील, संजय हिवरकर, अतुल वंजारी, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, हिरालाल पाटील, राजेंद्र मेढे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चौरे, अक्रम शेख, ईश्वर पाटील यांनी दोन दिवस धुळे येथे थांबून संशयित आरोपी साहिल प्रवीण झाल्टे उर्फ साहिल शेख याला पवन नगरातून अटक केली. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान साहिल झाल्टे याच्यावर धुळे येथे वेगवेगळे प्रकारचे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.