जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे जळगावमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. गेल्या दशकापासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या निधी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा आनंद साजरा केला असून, संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यकांत विसपुते यांनी याला ‘मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन’ चळवळीचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.

निधी फाऊंडेशन गेल्या दहा वर्षांपासून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात मासिक पाळीबाबत जनजागृती करत आहे. संस्थेच्या वतीने राबविलेल्या ‘मासिक पाळी कापडमुक्त अभियान’ अंतर्गत हजारो मुलींना सुरक्षित आरोग्य आणि स्वच्छता यांचे महत्त्व पटवून दिले गेले आहे. यासोबतच शासकीय कार्यालये व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन बसवण्याचे कार्यही संस्थेने यशस्वीरित्या राबवले आहे.

वैशाली विसपुते यांनी सांगितले, “शाळांमध्ये मुलींना स्वच्छता आणि मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा त्यांचे शिक्षण अडथळ्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व शाळांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहे, साबण-पाणी व मोफत ऑक्सो-बायोडिग्रेडेबल पॅड्स उपलब्ध होतील, ज्यामुळे मुली आत्मविश्वासाने शाळेत हजेरी लावू शकतील.”
तसेच त्यांनी पुढील पाऊल म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. शाळांबरोबरच रेल्वे, बस व विमान प्रवास व्यवस्थेत ही सुविधा लागू केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वैशाली विसपुते म्हणाल्या, “हा निर्णय ‘शिक्षणाचा अधिकार’ आणि ‘मानव सन्मान’ यावर ठळकपणे प्रकाश टाकतो. निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून राबविलेल्या अभियानाचे यथार्थ यश आज मिळाले आहे. आता कोणतीही मुलगी मासिक पाळीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तसेच ही सुविधा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही लागू होणे आवश्यक आहे.”



