नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेला बसावे लागते. त्यामुळे असा आदेश शेवटच्या क्षणी देता येत नसल्याच्या सूचना कोर्टाने दिल्या. अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे अशा शहरांत आहेत, जिथे पोहोचणे कठीण आहे, असे म्हणत ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.
नीट पेपरफुटी प्रकरणी देशभर गदारोळ माजला असून या गैरव्यवहाराचे धागेदोरे अनेक जिल्ह्यांत आढळले. त्यामुळे पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उमेदवारांना केंद्रांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, वेळेच्या कमतरतेमुळे उमेदवारांना विशिष्ट शहरांमध्ये जाण्याची व्यवस्था करणे कठीण जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. नीट पीजी परीक्षा यापूर्वी २३ जून रोजी होणार होती. परंतु स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ती पुढे ढकलण्यात आली होती.
नीट प्रकरणी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत सु्प्रीम कोर्टाने ५ विद्यार्थ्यांमुळे २ लाख विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आणू शकत नाही. यावर याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील संजय हेगडे म्हणाले की, हा पाच नाही ५० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.
दोन लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा १८५ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेची तिकिटे मिळणार नाहीत आणि विमानाचे भाडेही वाढणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे जवळजवळ अशक्य आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, पारदर्शकतेचा अभाव आणि दुर्गम परीक्षा केंद्रांमुळे उद्भवणारी आव्हाने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान करू शकतात.