नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तुम्हाला देशात शांतता नकोय का? अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका आज फेटाळून लावली. यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्यावर जोरदार ताशेरेही ओढले.
पंडित अमरनाथ मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अयोध्येतील वादग्रस्त जागेवर पूजा करण्याची परवानगी मागितली होती. त्यावर देशात शांतता रहावी आणि लोकांनीही शांततेत जीवन जगावे, असे तुम्हाला वाटत नाही का ? असा सवाल कोर्टाने त्यांना केला. यापूर्वी अलाहाबाद कोर्टाने हीच याचिका फेटाळून लावत मिश्रा यांना पाच लाखांचा दंड ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश रद्द करण्यास नकार देत मिश्रा यांना अलहाबाद हायकोर्टाने ठोठावलेला दंडही कायम ठेवला आहे. अयोध्येतील मंदिराचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात प्रलंबित आहे. त्यानंतरही कोर्टात याचिका दाखल करण्यात येत असून कोर्ट अशा याचिका फेटाळून लावत आहे. अयोध्येतील जमिनीचा वादही कोर्टात प्रलंबित आहे.