कोलकाता, वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१२) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर आरोप केला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाचे स्वप्न पाहिले होते. पण येथील राज्य सरकारांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.
कोलकाता पोर्टला डॉ.मुखर्जी पोर्ट असे नाव देण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. कटमनी मिळत नसल्याने राज्य सरकार केंद्राच्या योजना लागू करत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता केला.
पश्चिम बंगालमधील सरकार आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता देईल, त्यावेळी येथील लोकांना या योजनांचा लाभ मिळेल. या योजनांना सरकार मान्यता देईल की नाही, हे मी सांगू शकत नाही. जर योजना राबवण्यास मान्यता दिली तर, येथील लोकांना त्यांचा लाभ मिळेल. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून ७५ लाख लोकांना गंभीर आजारपणात मोफत उपचार मिळाले आहेत. त्यात कोणताही मध्यस्थ नाही. कमिशन नाही. त्यामुळे या योजना कोण लागू करणार ? असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला.
‘प. बंगालच्या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी’
‘माझ्या मनात नेहमीच दुःख राहील आणि पश्चिम बंगालच्या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी दे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. गरिबांना आयुष्मान योजना आणि शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळावा,’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. कटमनीवरून काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेस भाजपच्या निशाण्यावर होता. पंतप्रधान मोदी यांनी कटमनीचा उल्लेख करून पुन्हा ममता सरकारवर निशाणा साधला आहे. कोलकाता पोर्टला भारतातील औद्योगिकरणाचे प्रणेते, पश्चिम बंगालच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून एक देश, एक विधानसाठी बलिदान देणारे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याची घोषणा करत आहे. आज या क्षणी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करत आहे, असेही मोदी म्हणाले.