बारामतीमध्ये २२ व २३ जून रोजी स्वाभिमान संघटनेची राज्य कार्यकारणीची बैठक होणार

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदारकी व आमदारकी पेक्षा शेतकरी व सर्वसामान्यांसाठी चळवळीचा मुकूट आपल्या डोक्यावर शोभून दिसतो. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून न जाता चळवळीचा निखारा पेटता ठेवून राज्यभर विविध प्रश्नासाठी आंदोलने, मोर्चे चालूच ठेवावेत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षाच्या राज्य कार्यकारणीत बोलताना केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नुकतीच निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये विजयीं होण्याची त्यांना मोठी अपेक्षा होती. दोन वेळा खासदार झालेले राजू शेट्टी या निवडणुकीच्या माध्यमातून तिसऱ्यांदा शिवारातून संसदेत पोहोचतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना एक लाख ८० हजार इतकी मते मिळाली. हा त्यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का आहे. याबाबत आता पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील सर्व पदाधिकारी यांची आज ॲानलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभेतील अपयशानंतर स्वाभिमानीची राजकीय व चळवळीच्या पुढील ध्येय धोरणासंदर्भात राज्यातील पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वच पदाधिकारी यांनी इथून पुढे शेतकरी आंदोलन व चळवळीशी प्रतारणा न करता प्रामाणिकपणे करावी व स्वाभिमानीचे राजकारण वेगळ्या पध्दतीने करावे अशा पध्दतीचे भुमिका मांडण्यात आली. या भुमिकेला राज्यातील सर्वच पदाधिका-यांनी आपला एकमुखी पाठिंबा देत लवकरच याबाबत बारामती येथे २२ व २३ जून रोजी राज्य कार्यकारणीची बैठक घेऊन पुढील दिशा स्पष्ट करण्याचे ठरले.

सध्या राज्यामध्ये दुष्काळ, अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले असून महागाईमुळे शेतकरी पिचला गेला आहे. यामुळे कांदा , सोयाबीन , कापूस , ऊस , द्राक्ष , संत्रा ,डाळींब , धान , मका उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चे व आंदोलने करून शेतक-यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवायचा आहे. याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी , प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील व संदीप जगताप यांच्या नेतृत्वात विविध प्रश्नावर राज्यभर दौरे सुरू करण्यात येणार आहेत.

त्याबरोबरच विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, अमरावती, बुलढाणा, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यातील विविध विधानसभेच्या जागेसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढविण्याबाबत तसेच महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपात अनेक चांगले उमेदवारांना तिकीट मिळणार नसल्याने आपापल्या विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवारांची चाचपणी करून विधानसभेला पुर्ण ताकदीने उमेदवार उभे करण्याची चर्चा झाली.यावेळेस राज्यातील सर्व राज्य कार्यकारणीची प्रमुख पदाधिकारी ऊपस्थित होते.

Protected Content