Home Cities जामनेर  दुर्गा उत्सवात “भुतांची आरास” ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू! 

 दुर्गा उत्सवात “भुतांची आरास” ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू! 

0
180

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर शहरातील श्रीकृष्ण नगर येथे दुर्गा उत्सवानिमित्त श्रीकृष्ण तरुण दुर्गा मित्र मंडळातर्फे साकारण्यात आलेला “भुताचा खेळ” सजीव देखावा सध्या शहरवासीयांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. नवरात्रीत नेहमीपेक्षा हटके आणि थरारक अनुभव देणारा हा देखावा पाहण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक आणि नागरिक गर्दी करत आहेत.

श्रीकृष्ण दुर्गा मित्र मंडळाने यंदा दुर्गा मातेच्या भव्य आणि देखण्या मूर्तीसह एक वेगळा कलात्मक व सामाजिक संदेश देणारा देखावा उभा केला आहे. ‘भुताचा खेळ’ या संकल्पनेवर आधारित हा देखावा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, अंधश्रद्धा, अज्ञान आणि भीती यावर भाष्य करणारा आहे. अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून समाजप्रबोधन करण्याचा उद्देश या देखाव्यामागे असल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

देखाव्याची रचना आणि सजीव सादरीकरण इतकं प्रभावी आहे की, प्रत्यक्षात काहीतरी ‘भयानक’ घडतंय, अशी अनुभूती येते. ध्वनी-प्रकाशाच्या समन्वयातून तयार करण्यात आलेल्या या सजीव देखाव्याने प्रेक्षकांना थरारून सोडलं आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक याचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे श्रीकृष्ण नगर परिसरात रोज संध्याकाळनंतर गर्दीचा महापूर उसळत आहे.

गेल्या पंचवीस वर्षांपासून श्रीकृष्ण तरुण दुर्गा मित्र मंडळ विविध सामाजिक उपक्रम आणि नाविन्यपूर्ण देखावे सादर करत आले आहे. यंदाही मंडळाने आपली परंपरा कायम ठेवत एक आगळा-वेगळा अनुभव शहरवासीयांसाठी उभा केला आहे. मंडळाचे अध्यक्ष पंकज जोशी, सचिव प्रमोद पाटील, मयूर मोरे, किरण शिंदे, स्वप्निल बडगुजर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा देखावा यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत.

या उत्सवामुळे केवळ धार्मिक वातावरण निर्माण झालेले नाही, तर समाजजागृतीचा ठोस संदेशही दिला जात आहे. देखावा पाहताना देवीचे दर्शन आणि थरारक अनुभूती एकत्र मिळत असल्याने नागरिकांना यंदाचा दुर्गा उत्सव अधिक लक्षवेधी वाटतो आहे.


Protected Content

Play sound