एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्लॉट विक्री च्या वादातून व कौटुंबिक कारणावरून विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) या ६० वर्षे वय असलेल्या वृद्धेचा दगडावर आपटून तिच्याच मुलाने व सुनेने हृदयद्रावक हत्या केल्याची घटना येथील केवडीपूरा भागात रविवारी भल्या पहाटे उघडकीस आली.
या घटनेबाबत मृत महिलेच्या बहिणीच्या मुलाने एरंडोल पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली. यानुसार, मृत महिलेच्या राहत्या घराशेजारी तिच्या नावे असलेला खुला भुखंड मुलगा बापू मोहिते यास विकायचा असल्याने मुलगा व सून वारंवार त्रास देत व मारहाण करीत असल्यामुळे संबंधीत महिला ही धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील नातेवाईकांकडे काही काळ वास्तव्यास होती. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी मुलगा व सून यांस समजावून विमलबाई हिस एरंडोल येथे एकत्र राहण्यास पाठवले होते.
दरम्यान, ही महिला घरी आल्यानंतर देखील प्लॉट विक्रीवरून तिचा छळ सुरू होता. यातच, रविवारी पहाटे साडेतीन वाजता दोन्ही आरोपींनी दगडाने ठेचून विमलबाई मोहिते हीचा निर्घृण खून केला. याबाबतची माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली.
पोलिस निरीक्षक सतिश गोराडे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्यात वापरलेला दगड हस्तगत केला असून तपास पोलिस निरीक्षक गोराडे हे करित आहेत. तर, या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलगा बापू रोहिदास मोहिते(बेलदार) वय -४० व सून शिवराबाई बापू मोहिते वय-३५ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.