अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथे काल (दि.३) सायंकाळी मातीच्या घराचे छत अचानकपणे कोसळून एक महिला जखमी झाल्याची घटना घडली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले आहेत.
अधिक माहिती अशी की, आशाबाई नारायण चौधरी ह्या सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे स्वयंपाक बनवत असताना त्यांचे पती नारायण चौधरी व मुलगा योगेशही त्याच खोलीत बसले होते. नारायण चौधरी अचानक बाहेर गेले, त्याचक्षणी घराचे धाबे कोसळले अन मोठा आवाज झाला. छताच्या ढिगाऱ्याखाली आशाबाई व मुलगा योगेश दाबले गेले. योगेश हा कंबरेपर्यंत अडकल्याने त्याला लागलीच बाहेर काढण्यात आले. मात्र आशाबाई त्या मातीच्या ढिगार्यात अडकल्याने सुरुवातीला मातीच्या धुराळ्यामुळे काहीही दिसत नव्हते, मात्र लोकांनी ताबड़तोब माती बाजूला करीत आशाबाई यांनाही बाहेर काढले.
नारायण चौधरी यांनी आरडा-ओरड करून लोकांना गोळा केल्याने व वेळीच मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. दरम्यान आग लागली, अशी माहिती मिळाल्याने मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेंबळे व तलाठी एस. बी. बोरसे यांनी गावात भेट दिल, तेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली असता त्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.