जळगाव प्रतिनिधी । बऱ्हाणपूर मध्यप्रदेशातील १० वर्षीय बालिकेला घरी झोपलेली असताना सर्पदंश झाल्यामुळे वैद्यकीय उपचार सुरु झाले. मात्र प्रकृती खालावल्याने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तब्बल ३४ दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर बालिकेचा जीव वाचून तिला डिस्चार्ज देण्यात यश मिळाले आहे. यामुळे बालिकेच्या परिवाराने रुग्णालयातील यंत्रणेचे आभार मानले.
मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात राहणाऱ्या १० वर्षीय बालिकेला १७ जानेवारी रोजी अतिजहाल सर्पाचा दंश झाल्याने तिची तब्येत बिघडली होती. स्नायू कमजोर होऊन श्वास थांबत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होते. नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात १८ जानेवारी रोजी संध्याकाळी तिला उपचारकरीता दाखल केले. बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागातील तज्ज्ञांनी तिची तपासणी केली असता उजव्या पायाच्या पंजाला दंश झाल्याने मोठी सूज आलेली होती. दम लागत होता.
तत्काळ तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सूज वाढत असल्याने तिच्या शरीरावर पोटात रक्तस्राव होणे आदी दुष्परिणाम सुरु झाले होते. तिला अँटिबायोटिक आणि इतर औषधी सुरु झाली. पायाची दंश झालेली जागा खराब झाल्यामुळे मांडीची कातडी काढून तिला पायाच्या ठिकाणी ट्रान्सप्लांट करण्यात आली. यानंतर बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. अखेर २२ फेब्रुवारी रोजी ३४ व्या दिवशी तिला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्या उपस्थतीत डिस्चार्ज देण्यात आला.
बालिकेवर बालरोग विभाग, औषधवैद्यक शास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र विभागाच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वी उपचार करून जीवदान देण्यात यश आले. यासाठी शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद चौधरी, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. गिरीश राणे, डॉ. बालाजी नाईक, डॉ. मानसा सी., डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. जयश्री गिरी, डॉ. विश्वा भक्ता यांनी परिश्रम घेतले.