मालवाहू वाहन चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथून मालवाहू छोटा हत्ती वाहन चोरी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलीसांनी जळगावातील मास्टर कॉलनीतून अटक केली आहे. दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्नील गोविंदा राठोड रा. कुसुंबा ता.जळगाव यांचे ९ लाख रूपये किंमतीचा मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १९ सीएक्स ०३९०) राहत्या घरासमोरून चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २२ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी तपासाला सुरूवात केली. तपासात, वाढत्या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तपासासाठी सखोल मार्गदर्शन केले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने घटनास्थळावर आणि आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपीने मास्क लावून आणि बनावट चावीने वाहनाचे लॉक उघडले होते, अशी माहिती समोर आली. यामुळे चोरी करणारा आरोपी ओळखीचा असावा, असा पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार रपोलीसांनी आरोपी असरार शेख मुक्तार शेख (वय 25) आणि मुश्ताक हसन सैय्यद (वय 42), हे दोन्ही रा. मास्टर कॉलनी, जळगाव यांना ताब्यात घेतले,. यातील मुश्ताक सैय्यद हा स्वप्नील राठोड यांच्याकडून वारंवार वाहन भाड्याने घेत होता, आणि त्यानेच बनावट चावी तयार करून, आपल्या मित्र असरार शेख यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

<p>Protected Content</p>