नाशिक वृत्तसंस्था । कोरोना विषाणू बाबत जनजागृती व्हावी ह्यासाठी शारदा क्रिएशन प्रस्तुत “सुरक्षित कुटुंब” हा लघुपट तयार करण्यात असून ह्या लघुपटाचं प्रकाशन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. “सुरक्षित कुटुंब” हा लघुपट कोरोना काळात मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.
नाशिक जिल्हयात कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी, बेफिकीर राहून चालणार नाही. स्वयंशिस्त पाळणं हे कोरोनाशी मुकाबला करण्याचे उत्तम साधन असून या आजाराबाबत “सुरक्षित कुटुंब” या लघुपटपटाव्दारे जनजागृती करून निश्चितपणे नाशिक कोरोनामुक्त करू असा विश्वास जिल्हाधिकारी सुरज मांढरे व्यक्त केला.
2020 या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरासह भारतातही कोरोना विषाणू सावट पसरण्यास सुरुवात झाली. आधुनिकतेकडे वाटचाल करणारे देशही कोरोनापुढे झुकले. संपुर्ण जगासाठीच ही महामारी नवीन असल्याने सुरूवातीच्या काळात अनेकांचे या आजाराने बळी गेले. परंतु शासन, आरोग्य यंत्रणा,महसूल यंत्रणा, पोलीस प्रशासन,महानगरपालिका आणि संबधित विभागांनी एकत्रित येत केलेल्या नियोजनामुळे आज या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. अर्थातच यात नागरीकांनी दाखवलेला संयम आणि केलेले सहकार्य हेही तितकेच महत्वाचे आहे. या आजारामुळे आरोग्याची काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे अधोरखित झाले आणि एक आरोग्य चळवळ यामुळे सुरू झाली. राज्यात सर्वत्र मोठया प्रमाणात या आजाराचा संसर्ग वाढत असतांना नाशिक जिल्हयात मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले. नंतरच्या काळात जिल्ह्यात आजाराचा संसर्ग वाढत गेला. मालेगाव सारख्या भागात वाढत्या संसर्गामुळे शासनाचे लक्ष मालेगावकडे लागून होते मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, शासन स्तरावरून यंत्रणेला दिलेले पाठबळ यामुळे आज नाशिकमध्ये कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. परंतु असे असले तरी आपल्याला बेफिकीर राहून चालणार नाही. त्यामुळे आता प्रत्येकाने स्वतः आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.. म्हणूनच माझं कुटुंब माझी जबाबदारी ओळखून प्रत्येकाने सुरक्षेला प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. यादृष्टीने हा लघुपट निश्चितच नाशिककरांना मार्गदर्शक ठरेल असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
नाशिकचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुरेश चव्हाण यांच्या लेखणीतून सुरक्षित कुटुंब या लघुपट साकारण्यात आला आहे…माणसांनी घरातला वावरतांना, घराबाहेर पडल्यानंतर,आणि कार्यालयीन कामकाजामध्ये काय सुरक्षितता बाळगावी हा संदेश देण्यात आला आहे.. ह्या लघुपटाचं प्रकाशन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात करण्यात आलं.. यावेळी दिग्दर्शक आणि निर्माते सुरेश चव्हाण, अभिनेता कपिल भास्कर, सोनू जॉर्ज, कुमारी आलीया वझरे, लक्ष्मी पिंपळे, कडुंबा दंडगव्हाळ, सचिन बनतोडे, कुंदा शिंदे बच्छाव, धीरज वझरे आदी उपस्थित होते.