Home Cities यावल यावलमधील शिवसेना उबाठाचे यश लक्षणीय : गुलाबराव वाघ

यावलमधील शिवसेना उबाठाचे यश लक्षणीय : गुलाबराव वाघ

0
271

यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालेले यश लक्षणीय आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवसेना उबाठाचे जळगाव जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी सौ. छाया अतुल पाटील यांनी मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष यावलकडे वेधले गेले असून, येणाऱ्या काळात शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून यावल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीनंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना गुलाबराव वाघ म्हणाले की, शिवसेना उबाठाने यावलमध्ये जनतेचा विश्वास संपादन केला असून, भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून छाया पाटील यांनी पक्षाची ताकद सिद्ध केली आहे. मात्र, निवडणुकीदरम्यान काही पक्षातील गद्दारांनी दगा-फटका केल्यामुळे दोन उमेदवारांना अल्पमताने पराभव स्वीकारावा लागला, असा आरोपही त्यांनी केला. अशा गद्दारांवर कठोर कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी संबंधित माहितीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले. पक्षशिस्त महत्त्वाची असून, संघटनेला नुकसान पोहोचवणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांचा तसेच शिवसेना उबाठाचे विजयी नगरसेवक सागर चौधरी आणि नगरसेविका वैशाली निलेश बारी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील व गोपाळ चौधरी, यावल तालुका प्रमुख शरद कोळी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, उपशहरप्रमुख संतोष खर्च, तसेच माजी तालुका प्रमुख कडू पाटील यांची उपस्थिती लाभली. यावल येथील पाटील यांच्या फार्महाऊसवर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विजयी उमेदवारांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पारदर्शक कारभार व विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले.


Protected Content

Play sound