यावल, प्रतिनिधी | तालुक्यासह जिल्ह्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना गेल्या चार-पाच महिन्यांपासुन पगार न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. याबाबत राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी यापूर्वीच एका तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्याकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तालुक्यासह संपुर्ण जळगाव जिल्ह्यात विविध ग्रामीण रुग्णालय आणी उपप्राथमिक केन्द्र असुन या सर्व रुग्णालयांवर ४० वैद्यकीय अधिकारी हे कार्यरत आहेत. यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाले नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भातील एक पत्र वरिष्ठांना देण्यात आले असुन यात म्हटले आहे की, आता जुलै महीना संपणार असुनही अद्यापपर्यंत वैद्यकीय अधिकारी यांचे पगार झालेले नाहीत, तरी आता त्यांना कोणता पगार मिळणार आहे व कधी मिळणार आहे, ते कळत नाही. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु केला असुन, तत्काळ वैद्यकीय अधिकारी यांच्या आर्थिक नोंदी करून वेतनाचा फरक अदा करावा, त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांचा शिकाऊ कार्यकाळ मंजुर करून त्यांना वाढीव भत्ता सुरू करावा व पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नावे पाठवण्यात यावीत, अशा मागण्यांही निवेदनात करण्यात आल्या आहेत. त्या आधी या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदचे सीईओ बी.एन. पाटील यांची भेट घेवुन आपल्या विधिध अडचणी व समस्या मांडल्या होत्या. या शिष्टमंडळात डॉ.फिरोज एम. तडवी, डॉ.विनायक महाजन, डॉ. विशाल पाटील, डॉ.मनिषा महाजन, डॉ.संदीप पाटील, डॉ.विक्रम गोखले, डॉ.गिरीश गोसावी यांचा समावेश होता.