यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील सातोद येथील आंगणवाडीचे छत बांधकामानंतर पहिल्याच पावसात गळू लागल्याने या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या चिमकुल्यांचे जिवाला धोका निर्माण झाला आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आंगणवाडीच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील सातोद येथे गेल्या वर्षीच सुमारे चार ते पाच लाख रुपये खर्चाच्या निधीतुन बांधण्यात आलेल्या आंगणवाडीच्या छतातुन पहिल्याच पावसाळ्यात पाण्याची गळती होत असल्याने कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या आंगणवाडीला ठेवण्यात आलेल्या खिडक्या या आंगणवाडी बंद झाल्यावरही खुल्याच असतात. या संदर्भात आंगववाडीत जावुन अधिक माहीती घेतली असता अशी माहीती समोर आली की, सदर आंगणवाडीच्या खिडक्या या बंद केल्यावर देखील लागत नाहीत. या खिडक्या कायमच्या खुल्या राहात असल्याने यातुन साप-विंचू असे प्राणी सहज आत प्रवेश करू शकतात. आंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांच्या जिवितास त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी प्रशासनाने तत्काळ दखल घेवुन, काही अप्रीय घटना घडु नये याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.