मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीमुळे जोरदार फटका बसला आहे. वंचित आघाडीमुळे काँग्रेस आघाडीच्या नऊ जागा पडल्या असून त्यात अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
काँग्रेससोबत जागा वाटपाची चर्चा पुढे जाऊ शकली नसल्याने वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यामुळे काँग्रेसला बीड, बुलडाणा, गडचिरोली-चिमूर, नांदेड, परभणी, सोलापूर आणि यवतमाळमध्ये पराभव पत्करावा लागला. तर हातकणंगले आणि सांगलीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. या आठही जागांवर वंचित आघाडीच्या उमेदवारांनी एक लाखांपेक्षाही अधिक मतं घेतल्याने काँग्रेस-स्वाभिमानी आघाडीचा पराभव झाला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींना पराभव पत्करावा लागला आहे.