नागपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा- प्रामाणिकपणे मैत्री करणे आणि ती निभावून नेणे हि कॉंग्रेसची भूमिका आहे. आम्ही आघाडी धर्म पाळला असून समोरून लढतो पाठीमागून वार नाही करत. माझ्यावर टीका करणाऱ्यांची पार्श्वभूमी माहित असून राष्ट्रवादीकडून काय वागणूक मिळाली हे पक्षश्रेष्ठींना अवगत केले जाईल, दगाफटका खपवून घेणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीसाठी महाविकास आघाडीचा लिखित करार होऊनही राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करीत सत्ता स्थापन केली. याला दगाबाजपणा नाही तर काय म्हणावे. माझी पार्श्वभूमी सर्वाना माहित आहे. काँग्रेस देशाच्या विकासाची लढाई लढतो, परिणाम चिंता करीत नाही.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा करार करून माझ्यासह जयंत पाटील, आणि शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी सह्या केल्या. मात्र राष्ट्रवादीने शेवटच्या घटकेपर्यत ताटकळत ठेवून ऐनवेळी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. भाजपसोबत जायचे आहे हे अगोदरच सांगितले असते तर काहीच हरकत नव्हती, परंतु कॉंग्रेसला अंधारात ठेवून भाजपसोबत सत्ता स्थापन केली याला पाठीत खंजीर खुपसला असे नाहीतर काय? असेही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.