जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटेनगर ते गिरणा नदीच्या पुलापर्यंत सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गच्या संथ कामामुळे वाहतुकीची भीषण कोंडी होत आहे. या कोंडीमुळे रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिक हवालदिल झाले असून, प्रशासनाने अवजड वाहतूक तातडीने बायपासमार्गे वळवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीने दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल :
सध्या १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. महामार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने आणि रस्त्याच्या अरुंदपणामुळे तासनतास वाहतूक ठप्प होत आहे. यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यास उशीर होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे, जळगावकडे येणाऱ्या किंवा मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका या कोंडीत अडकत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

अपघातांचे प्रमाण वाढले :
एकाच मार्गावरून दोन्ही बाजूंची अवजड वाहतूक सुरू असल्याने लहान वाहने रस्त्याच्या कडेला उलटण्याच्या घटना वाढल्या आहेत. छोट्या-मोठ्या अपघातांमुळे हा रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष न दिल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रमुख मागण्या आणि इशारा :
बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष सुनील देहडे यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी करण्यात आली आहे. “वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहने तरसोद बायपासमार्गे धुळ्याकडे आणि पाळधी बायपासमार्गे तरसोदकडे वळवावीत. पाळधी व तरसोद येथे बॅरिकेट्स लावून पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा,” अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा संघटनेने घेतला आहे. यावेळी सुमित्र अहिरे, देवानंद निकम, खुशाल सोनवणे, राहुल सोनवणे, दिलीप जाधव, डी.एम. भालेराव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



