जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धावत्या रिक्षा समोर अचानक कुत्र आडव आल्यामुळे रिक्षा उलटून यशवंत डोके (वय ३५, रा. भुसावळ) हा तरुण ठार झाला. तर रिक्षातील इतर पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जवळील हॉटेलसमोर झाला. जखमींवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जळगावकडून भुसावळकडे जाणारी रिक्षा महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय समोरुन जात होती. यावेळी अचानक रिक्षा समोर कुत्र आडव आल. त्यामुळे रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील प्रवासी यशवंत डोके हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेले इतर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत. जखमींना तात्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अपघातात ठार झालेल्या यशवंत डोके याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
रिक्षा उलटून झालेल्या अपघातात उषाबाई वारके रा. भुसावळ, चालक महेश सातव, मंगलसिंग राजपूत, शबानाबाई पिंजारी व नरेंद्र मराठे हे गंभीर जखमी झाले. यातील शबानाबाई पिंजारी व नरेंद्र मराठे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.