जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील आझाद चौक येथे रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरुन रिक्षाचालकाच्या हातावर त्यांच्या घराजवळच राहणार्याने विळा मारल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पिंप्राळा येथील आझाद चौक येथे शेख शकील शेख रौफ (वय ३५) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ७ जून रोजी सकाळी रिक्षा काढत असतांना शेख शकील यांच्या रिक्षाचा घराजवळच राहणार्या सुभान खान ईस्माईल खान यांना धक्का लागला. यावेळी त्याने वाद घातला. मात्र गल्लीतील रहिवाशांनी हा वाद मिटविला होता. आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कालच्या भांडणाच्या कारणावरुन सुभान खान व त्याचा भाऊ कुरबान खान ईस्माईल खान यांनी रिक्षाचालक शेख शकील यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.
यादरम्यान सुभान खान याचे वडील ईस्माईल यान हे हातात विळा घेवून आले व त्यांनी विळा रिक्षाचालक शेख शकील यांच्या डाव्या हातावर मारुन दुखापत केली. तिघांनी तुला सोडणार नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकीही दिली. शेख शकील यांचे आई वडीलांनी हे भांडण सोडविले. शेख शकील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात सुभान खान ईस्माईल खान, कुरबान खान ईस्माईल खान, ईस्माईल खान कळे खान सर्व रा. आझाद नगर, पिंप्राळा या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश डोलारे हे करीत आहेत.