चाळीसगाव ( प्रतिनीधी ) जेष्ठ नागरिकांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्या मंजूर कराव्या यासाठी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणीस यांना तहसीलदार यांच्यामार्फत नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनावर २१५ सह्या आहेत. त्यात एकूण सहा मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनात ६० वर्षावरील व्यक्तींनाच ज्येष्ठ नागरिक समजण्यात येऊन त्यांना सर्व शासकीय सवलतीचा लाभ देण्यात यावा, ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ ची अंमलबजावणी करण्याकरीता लागणाऱ्या खर्चाची तरतुद येत्या आथिर्क बजेट मध्ये / प्रसंगी पुरवणी बजेट मध्ये करावे, श्रावणबाळ वैधव्य निवृत्ती वेतनात रुपये ६००० ऐवजी रुपये २००० निवृत्ती वेतन शासनाने द्यावे, ज्येष्ठ नागरिक विविध आजारांनी त्रस्त असतात म्हणून त्याचे करीता विनामुल्य आरोग्य विमा योजना त्वरित चालू करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग किंवा आयुक्तालय सुरू करावे व स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री त्या करीता नेमावे, शेतकरी व शेतमजूर, ६० वर्षावरील सर्व प्रकारच्या दारिद्र्य रेषेखालील मजुरांना शासनाने दरमहा रुपये ५ हजार रुपयांपर्येंत निवृत्ती वेतन द्यावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनावर अध्यक्ष पी.एन.पाटील, प्रल्हाद नवले, नाना पाटील, अर्जुन पाटील भोरस, महाजन (शिक्षण अधीकारी), अशोक पाटील, रमेश पोतदार, पी. ए. पाटील व सदस्याच्या सह्या आहेत.