बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग योग्य प्रकारे करून जास्तीत-जास्त टेस्टिंग कराव्या आणि रुग्णांना त्याचा अहवाल लवकरात लवकर कसा मिळेल याचे योग्य नियोजन करावे, असे आदेश जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनामध्ये आयोजित कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकी दरम्यान जिल्हा प्रशासनाला दिले.
फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन देखील करण्यात आला आहे. तरी देखील जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याची दखल जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी घेतली असून कोरोनामधून बरे झाल्यानंतर अशक्तपणा असतांना देखील मुंबईवरून येऊन आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची महत्वपूर्ण बैठक घेतली. यामध्ये जास्तीतजास्त कोरोना टेस्टिंग वाढवाव्या, सीसीसी सेंटरमध्ये रुगांना जेवणाची व राहण्याची चांगली व्यवस्था करावी, सुरू असलेल्या कोरोना सेंटरमध्ये रुग्ण असो व नसो मात्र आरोग्य यंत्रणा हजर असलीच पाहिजे, नांदुरा व हिवरा आश्रम येथील सीसीसी सेंटर तीन दिवसात सुरू करावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणी नुसार त्याठिकाणी तात्काळ नियुक्त्या द्याव्या, ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तलाठी, ग्रामसेवकांना गावात मोठ्याप्रमाणात होणारे लग्न समारंभ, कार्यक्रम यावर कडक कारवाही करण्याचे आदेश देण्यात यावे, एम पी मधून येणाऱ्या प्रवाशांची योग्य तपासणी करावी तसेच जिल्ह्यातील सर्व यात्रा रद्द कराव्या असे आदेश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.
तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडून 13 ही तालुक्याच्या कोरोना परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांना त्याठिकाणी येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा देखील त्यांनी आढावा घेतला. लसीकरणाच्या ठिकाणी सुसूत्रता ठेवावी, लसीकरणासाठी येणारे हे वयोवृद्ध असून त्यांना उणाचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. ही लस म्हणजे 100 टक्के कोरोणापासून संरक्षण आहे असं नाही, ज्यांनी ही लस घेतली त्यांनी देखील त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पालकमंत्री महोदयांनी यावेळी केले.
या बैठकीला जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
16 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्र शिंगणे हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांनतर ते मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. 23 फेब्रुवारी रोजी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली होती. त्यांना मोठ्याप्रमाणात अशक्तपणा असल्याने विलगिकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. विलगिकरणात असताना दररोज ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते. परंतु जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचं बघून त्यांनी 6 मार्च रोजी प्रत्यक्ष बुलढाणा येथे येऊन कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक घेतली. त्यामुळे ते जिल्ह्याप्रति किती संवेदनशील आहेत ते यावरून दिसून आले.