बदलापूर रेल रोको आंदोलनातील आंदोलक बदलापूरचेच

बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापुरात दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारांनंतर उसळलेल्या आंदोलनातील सहभागी हे बदलापूर शहराचेच नागरिक असल्याचे उघड झाले आहे. बदलापूर शहरात २० ऑगस्टला झालेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. मात्र, हे आंदोलक बदलापुरातील नसून बाहेरचे असल्याची भूमिका स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती.

भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी देखील हाच पवित्रा घेतला होता. मात्र, या आंदोलनात अटक झालेल्या २५ जणांवरून खुलासा झालाय की हे आंदोलक शहरातील होते. त्यांच्यावर नोंद झालेल्या एफआयआरमध्ये त्यांचे पत्ते नमूद करण्यात आले आहेत. यातील रायगड जिल्ह्यातील उकरूळ येथील एक, भिवपुरी येथील दुसरा तर बदलापूर शहराच्या हद्दीपासून जवळच्या कासगांव येथील एक असे ३ अटक आंदोलक शहराबाहेरील आहेत. तर उर्वरित २२ आंदोलक हे बदलापूरचे रहिवासी आहेत. तसेच,यातील प्रमुख २५ आरोपी आणि त्यांची नावे पाहता ते देखील बदलापूर शहरातील असल्याचं उघड झालंय.यामुळे बदलापूर शहरातल्या आंदोलनात बदलापूरकर नसल्याची राजकीय नेत्यांची ओरड उघडी पडली आहे.

Protected Content