जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विद्यमान अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली चळवळ अंतर्गत नूतन मराठा महाविद्यालयात ‘वारी युपीएससीची’ संवाद यात्रा कार्यक्रम महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज गुरुवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून अभिजित राजेंद्र पाटील (IAS) व देवराज पाटील (IPS) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख सर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. भागवत पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात देवराज पाटील यांनी’ “यूपीएससीची तयारी करताना पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अभ्यासाची तयारी कशी करावी याविषयी मांडणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी स्वतःचे अनुभव कथन केले. यूपीएससीचा अभ्यास करत असताना परीक्षेचा अभ्यासक्रम क्रमिक पुस्तके तसेच ऑनलाईन उपलब्ध असणारे संदर्भित पुस्तके व गुगल, यु ट्यूब इत्यादीचा वापर करून आपण स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून अभ्यासात सातत्य ठेवून आपली वाटचाल करावी.” असे सांगितले. यूपीएससीच्या पूर्व परीक्षापासून ते मुख्य परीक्षेसाठी असणारे सर्व विषयावर त्यांनी सांगोपांग चर्चा केली. विद्यार्थ्यांनी मौखिक परीक्षेसाठी जाताना व्यक्तिमत्व विकास, स्वतःवरील आत्मविश्वास कसा वाढेल यावर लक्ष केंद्रित करावे यावर भर दिला.
कार्यक्रमासाठी लाभलेले दुसरे वक्ते अभिजीत पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात “यूपीएससीच्या मौखिक परीक्षेची तयारी कशी करावी यासंबंधी विवेचन केले. स्वानुभवातून त्यांनी विद्यार्थ्यांना मुख्य विषयाकडे वळते केले. जिद्द, चिकाटी मेहनत याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने विचार करायला हवा, या परीक्षेची तयारी करत असताना साधारणपणे दोन ते तीन वर्ष पूर्णपणे अभ्यास करून यूपीएससी परीक्षेच्या मागील वर्षांच्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज पूर्णपणे सोडवण्याची आणि मग मुख्य परीक्षेला सामोरे जाण्याची मानसिक तयारी असावी असे त्यांनी आवर्जून सांगितले. मौखिक परीक्षेला सामोरे जाताना आपल्या मनावर कुठलाच ताण नसावा तसेच आपले प्रयत्न, योग्य दिशा व मार्गदर्शन या सर्वांची जोड मिळाली तर यश आपलेच आहे असे त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून काही काळ दूर राहावे तसेच यूपीएससीचा अभ्यास करत असताना व्यायाम व आपल्या वेगवेगळ्या छंद सुद्धा जोपासावेत.” असे व्यक्तिगतरित्या सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात माननीय दिलीप पाटील यांनी “शासनातर्फे होऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला.” प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना दोन्ही वक्त्यांनी समर्पक उत्तरे दिली व शंका निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य राजेंद्र देशमुख यांनी केले. प्रा. डॉ. अविनाश बडगुजर यांनी मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महेंद्र भोईटे, उपप्राचार्य डॉ. माधुरी पाटील पदव्युत्तर समन्वयक डॉ. के बी पाटील, वरिष्ठ महाविद्यालयातील तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक. प्राध्यापिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते.