बंगळुरू (वृत्तसंस्था) कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. व्ही. जी. सिद्धार्थ हे प्रसिद्ध कॅफे चेन CCD (कॅफे कॉफी डे) चे मालक आहेत.
सोमवारपासून सिद्धार्थ यांचा मोबाईलही स्विच ऑफ आहे. त्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासहीत त्यांचे पूर्ण कुटुंब चिंतेत आहे. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी पोलीसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हेदेखील एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. सिद्धार्थ हे सोमवारी (29 जुलै) आपल्या कारने प्रवास करत होते. सिद्धार्थ सोमवारी संध्याकाळी जवळपास सहा वाजण्याच्या सुमारास नेत्रावती नदीच्या पुलाजवळ कारमधून उतरले. त्यांनी ड्रायव्हरला लगेचच येतो असं सांगितलं. ड्रायव्हरने ही अर्धा तास त्यांची वाट पाहिली पण सिद्धार्थ परत आलेच नाहीत. तसेच त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा फोनदेखील बंद आहे. त्यामुळे ड्रायव्हरने सिद्धार्थ यांच्या घरी फोन करून ते बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यामुळे कर्नाटकपोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.