अमळनेर (प्रतिनिधी) मुलगा व सुनेने मारहाण करून हाकलून दिलेल्या आई-वडील व म्हाताऱ्या आजीला तहसीलदारानी पोलिसांच्या मदतीने काल (दि.२१) त्यांच्या घराचा ताबा दिला. तहसीलदार व पोलीस आले हे कळताच मुलगा व सून घरातून निघून गेले होते. तहसीलदारांनी गल्लीतील नागरिकांसमक्ष पंचनामा करून घराला नोटीस चिकटवून वृद्ध दाम्पत्याला व त्यांच्या आईला घरात प्रवेश दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश गुलाब बडगुजर रा. वाघ बिल्डिंगजवळ यांनी ५ फेब्रुवारी रोजी आई वडील व ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याण अधिनियम २००७ अन्वये ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण अध्यक्ष तथा प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती की, मुलगा संतोष प्रकाश बडगुजर व सून सोनाली हे त्यांना व त्यांची पत्नी प्रमिला व त्यांची वृद्ध आई निर्मलाबाई यांना मारहाण करतात. त्यांनी प्रकाश बडगुजर यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून हाकलून दिले आहे. तसेच घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांनी प्रकाश बडगुजर यांच्या दोन मुले व दोन मुलींना नोटीस काढून सुनावणी घेतली व दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर चारही अपत्यांनी वृद्ध दाम्पत्याला प्रत्येकी ५०० रुपये द्यावेत, असे आदेश देऊन मुलगा संतोष याने त्यांना घरात राहू द्यावे, असेही निर्देशित केले आहे. तहसीलदारांनी १९७३ च्या कलम ९ मधील तरतुदीनुसार अंमलबजावणी करावी, असेही आदेशात म्हटले होते मात्र तरीही मुलगा घरात घेत नव्हता आणि आई वडिलांना धमकी देत होता म्हणून पुन्हा प्रकाश बडगुजर यांनी दि. २० रोजी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे ठाण मांडून तक्रार केली होती. त्यावेळी त्यांना रडूही कोसळले होते.
त्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी दि. २१ रोजी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, तलाठी गणेश महाजन, तलाठी प्रथमेश पिंगळे, संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, महिला कॉन्स्टेबल नाजीमा पिंजारी यांनासोबत घेऊन प्रकाश बडगुजर, प्रमिला बडगुजर व निर्मलाबाई बडगुजर यांना त्यांच्या स्वतःच्या घरात प्रवेश दिला. तहसीलदार व पोलीस आले हे कळताच मुलगा व सून घरातून निघून गेले. त्यावेळी तहसीलदारांनी गल्लीतील नागरिकांसमक्ष पंचनामा करून घराला नोटीस चिकटवून वृद्ध दाम्पत्याला व त्यांच्या आईला प्रवेश दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद पसरला. त्यांनतर तहसीलदार देवरे यांनी मुलाला भ्रमणध्वनीवरून कडक भाषेत समज देऊन वृद्ध आई वडिलांना पुन्हा त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी दिला.