जळगाव, प्रतिनिधी | लग्न करून सुखी राहायचे तर मग त्यासाठी कर्ज काढून दु:खी का व्हायचे ? जोडीदार निवडताना सकारात्मक सुसंवाद झाला पाहिजे. लग्न जुळविताना कुंडली दोष, जात विषमता अशा गोष्टीना थारा न देता थेट विवेकी पद्धतीने जोडीदाराची निवड करावी. कारण आयुष्य दोघांना काढायचे असते, असा सूर जोडीदाराची विवेकी निवड कार्यशाळेत शनिवारी उमटला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगावच्या वतीने जोडीदाराची विवेकी निवड कार्यशाळा झाल्टे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने दि. ११ जानेवारी रोजी बाहेती महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. ‘भावी जोडीदाराची निवड कशी करावी’ याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन कार्यशाळेत देण्यात आले. उदघाटनावेळी प्राचार्य डॉ. अनिल लोहार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे उपस्थित होते. प्रस्तावना कार्यशाळेचे सह समन्वयक विश्वजीत चौधरी यांनी केली. डॉ.लोहार यांनी, विवेकी विचारांनी जोडीदाराची निवड कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन महाराष्ट्र अनिस कार्यशाळेच्या माध्यमातून करित आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रवीण नागपुरे, आभार जितेंद्र धनगर यांनी मानले.
विविध सत्रांचे आयोजन
दिवसभरातील विविध सत्रात जोडीदाराची विवेकी निवड का करावी आणि कशी करावी अशी दोन सत्रे भोजनापूर्वी झाली. यात जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या राज्य कार्यवाह पनवेल येथील आरती नाईक व महेंद्र नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, संसाराला सहजीवनाची गरज असते. १५ मिनिटांच्या कांदे पोह्यापेक्षा ४ ते सहा महिने मुलगा मुलगी यांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ घेतला पाहिजे. परिचयोत्तर विवाह पद्धत वाढली पाहिजे. घरातील सर्व जेष्ठांनी दोघांनाच निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे सांगितले. दुपारी विद्यार्थ्यांची गटचर्चा घेण्यात आली. त्यानंतर स्त्री-पुरुष समानता-प्रत्येक नात्याला प्रशिक्षणाची गरज हे सत्र झाले. यात कोल्हापूर येथील स्वाती कोरे यांनी, सहजीवनातील समानता याविषयी बोलताना, विद्यार्थ्यांनी विवाह संस्थेतील विषमता कशी ओळखावी व कुठे असते याबाबत मांडणी केली. विविध सत्रात जोडीदाराची विवेकी निवड राज्य सहकार्यवाह मुंबई येथील सचिन थिटे आणि निशा फडतरे यांनी विद्यार्थ्यांना स्लाईड शो आणि पीपीटीच्या माध्यमातून जोडीदार निवडताना कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे व टाळल्या पाहिजे याबाबत सविस्तर सांगितले. नात्यातील सुरेल संवादासाठी १२ गुणांची विवेकी पत्रिका कशी असावी याबाबत सविस्तर माहिती निशा फडतरे यांनी सोदाहरण दिली. संसारात लहान सहान कारणावरून धुसफूस करण्यापेक्षा संसारात तडजोड करण्याचे महत्व मुलांनी जाणावे, असेही ते म्हणाले.
७ महाविद्यालयातील ५५ विद्यार्थ्यांचा सहभाग
यावेळी शहरातील विविध ७ महाविद्यालयातील ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शेवटी विद्यार्थ्यांनी संकल्पपत्र भरून दिली. समारोपाला जिल्हा प्रधान सचिव आर. वाय. चौधरी, शहराध्यक्ष अशफाक पिंजारी, नांदेड येथील सम्राट हटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळा यशस्वीतेसाठी शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर, प्रवीण नागपुरे, हमीद बारेला, शिरीष चौधरी, विजय लुल्हे, आर.एस.चौधरी, मिनाक्षी चौधरी, सायली चौधरी, दिलीप भारंबे, कल्पना चौधरी, जेसिका नाईक, सुरेश थोरात यांनी परिश्रम घेतले.