वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याबाहेरच्या आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी बोलवावे लागणे हे जळगाव जिल्ह्यातील विरोधी पक्षांच्या नेतृत्वाचे अपयश आहे, अशी टीका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या एकेरी टीकेचा निषेध करत काळे यांनी हा हल्लाबोल केला. गिरीश महाजन यांच्यावर आरोप केल्याशिवाय विरोधकांचे दुकान सुरू होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
सुनील काळे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, जर जिल्ह्याबाहेरच्या नेत्याला आंदोलन करण्याची गरज भासत असेल, तर याचा अर्थ जळगाव जिल्ह्यातल्या विरोधकांचे नेतृत्व संपले आहे. बच्चू कडू यांना बोलवावे लागते, यातून विरोधकांची राजकीय ताकद कमी झाल्याचे दिसते, असे काळे यांचे म्हणणे आहे.

शेतकरी आंदोलनावर दुहेरी भूमिका असल्याचा आरोप
काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. दहा वर्षांपूर्वी जेव्हा गिरीश महाजन यांनी कापसाला ७००० रुपये भाव मिळावा म्हणून आंदोलन केले होते, तेव्हा राज्यात राष्ट्रवादीचे सरकार होते. त्यावेळी शेतकऱ्यांना भाव का दिला नाही? आता सत्तेत नसताना शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवून काय फायदा? असा सवाल त्यांनी पाटील यांना विचारला. दुसऱ्यावर बोट दाखवण्याआधी स्वतःकडे चार बोटे आहेत हे लक्षात ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
खोटी सहानुभूती दाखवू नका
“तुम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, आता मात्र खोटी सहानुभूती दाखवत आहात,” असा आरोप करत काळे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेच तुम्हाला सोडून महायुतीत येत आहेत. प्रमोद पाटील यांनी मोर्चात गिरीश महाजन यांच्याविषयी केलेल्या एकेरी वक्तव्याचा निषेध करत त्यांनी असा संताप व्यक्त केला.



