जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ममुराबाद रस्त्यावर असलेल्या म्हाळसा देवी मंदिरात तसेच असोदा रेल्वेगेटजवळ असलेल्या शेतात शुक्रवारी पहाटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत एका सालदाराचा खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सालदाराचा खून करणारी आणि मंदिरात चोरी करणारी पावरा टोळी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी विविध भागात तपास पथक रवाना केले असून दरोदेखोरांचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर (वेळ निश्चित नाही) ममुराबाद रस्त्यावर असलेल्या म्हाळसा देवी मंदिरात अज्ञात ८ ते १० दरोडेखोरांनी लुटमार केली. मंदिरातील दानपेटी फोडत साधारण सहा ते सात हजार रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले. त्यांतर दरोडेखोरांनी मंदिरातील ८ ते १० घंटे चोरून नेले. यावेळी मंदिरा शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात देखील त्यांनी लुटपाट करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने दरवाजा न उघडल्यामुळे संबंधित व्यक्ती बचावला. या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार संबंधित दरोडेखोर हे पावरा बोलीभाषेत बोलत होते. त्यामुळे दरोडेखोरांची ही टोळी पावरा असल्याचे स्पष्ट आहे.
येथून दरोडेखोरांनी असोदा रेल्वेगेट परिसर गाठला. येथे पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात दौलत एकनाथ काळे (वय-६५ रा.मुक्तांगण हॉलजवळ, नेरी नाका) हे अनेक वर्षांपासून सालदार म्हणून काम पाहतात. दरोडेखोरांनी दौलत काळे यांना बेदम मारहाण करत त्यांच्या झोपडीत काही मिळेल म्हणून वस्तूंची फेकाफेक केली. परंतु त्यांना याठिकाणी देखील काहीही आढळून आले नाही. दरोडेखोरांनी काळे यांना लाकडी दांड्याने डोक्यात मारहाण करत हातपाय बांधून जवळच्या विहिरीत फेकून दिले. काळे हे गुरुवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. परंतु शुक्रवारी सकाळी घरी परत न आल्यामुळे त्यांच्या मुलाने फोन केला. परंतु काळे यांनी फोन उचलला नाही. त्यामळे काही नातेवाईक आणि नगरसेवक प्रवीण कोल्हे, पोलीस पाटील प्रभाकर काशिनाथ पाटील यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर त्यांना हा प्रकार उघडकीस आला. या सर्वांनी मिळून शेतात शोध घेतला असता काळे यांचे बूट आणि एक तुटलेला लाकडी दांडा मिळून आला. शेजारी असलेल्या विहिरीत डोकावून पाहिले असता बांधलेल्या अवस्थेत एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले आहे. मृतदेह बाहेर काढल्यावर तो काळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरोडेखोरांना काळे यांच्या झोपडीत काहीच मिळून न आल्यामुळे त्यांनी पुढील एका झोपडीत असलेली पाण्याची मोटार व वायर चोरून नेली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन व तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री.भागवत हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.दरम्यान, ममुराबाद रस्त्यावर असलेल्या म्हाळसा देवी मंदिरात चोरी करणारे आणि काळे यांना मारणारे दरोडेखोर एकच असल्याचा संशय आहे.या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
पहा : संबंधित घटनेबाबतचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा..