जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील पद्मालय वनक्षेत्रातील जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत कौशल्याने तपास करत केवळ ४८ तासांत या अंधाऱ्या खुनाचा छडा लावून मुख्य आरोपीला अटक केली आहे. गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील निर्जन जंगलात एका महिलेचा विद्रूप व अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ओळख पटू नये यासाठी आरोपीने चेहऱ्यावर आणि छातीवर ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळला होता. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेहाच्या नखांवरील मॅजंटा रंगाचे नेलपॉलिश आणि नाकातील सोन्याची मुरणी हे दोन धागे तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरले. तसेच मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून हा खून ३० किंवा ३१ जानेवारी रोजी झाला असावा, असे फॉरेन्सिक तज्ज्ञांनी स्पष्ट केले होते.

मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. प्राथमिक माहितीनुसार, मयत तरुणीचे नाव आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेद्रे (रा. सोनसरार, छत्तीसगड) असे आहे. संशयित आरोपीचे आकांक्षासोबत प्रेमसंबंध होते. वैयक्तिक वादातून आणि रागाच्या भरात आरोपीने आधी डोक्यात प्रहार केला आणि त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने स्वतःच्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढून मृतदेहावर ओतले आणि तिला पेटवून दिले होते. अशी माहिती संशयित आरोपीने दिले आहे. या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात संशयित आरोपीला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



