जळगाव, प्रतिनिधी | मागील सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे कर्जात बुडवलेली महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आहे. जळगाव महापालिकेला आता चांगले दिवस येणार असा आशावाद भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष तथा जळगाव प्रभारी रेखा बहनवाल यांनी व्यक्त केला.
महापालिकेत कायम सफाई कर्मचारी, मोकदम यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी बोलत होत्या. यावेळी आमदार राजुमामा भोळे , महापौर सिमा भोळे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती मंगला चौधरी, अखिल महाराष्ट्र सफाई कामगार संघटना अध्यक्ष नागेश कंडारे, दीप्ती देशपांडे, डॉ. विकास पाटील, उदय पाटील, अजय घेंगट आदी उपस्थित होते.आमदार राजुमामा भोळे व महापौर सिमा भोळे यांनी महापालिका कर्जमुक्तीकडे नेण्याचे, कर्मचाऱ्यांचे देय रक्कम देण्याबाबत प्रयत्न सुरु केले असल्याचे बहनवाल यांनी पुढे सांगितले. सफाई कामगारांना येणाऱ्या विविध समस्या, अडचणी याबाबत मेळाव्यात उहापोह करण्यात आला. नागेश कंडारे यांनी सफाई कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली. तर दीप्ती देशपांडे यांनी सफाई कामगारांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली. तसेच महिला सफाई कामगारांना असलेल्या विशेष अधिकारांची माहिती दिली. रेखा बहनवाला यांनी सफाई कामगार व मोकदम यांच्यात उद्भवणाऱ्या संघर्ष कशा प्रकारे टाळता येऊ शकतो याची माहिती दिली. विकासाचा अजेंडा घेऊन भाजपा सरकार काम करीत असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. कायम कर्मचारी सफाई कामगारांच्या ५७२ जागा भरण्यासाठी महापालिकेची आर्थिक अडचण पुढे करत वेळ मागून घेतली. मोदी व फडणवीस सरकारद्वारे सफाई कामागारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना जळगाव महापालिकेत व्यवस्थितपणे राबविण्यात येत आहेत किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी बहनवाल आल्या होत्या. मागच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे कर्जात बुडवलेली महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेला आता चांगले दिवस येणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.