मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC)कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षा देखील रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाले असून मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्व प्रकारच्या भरती परीक्षा रद्द करण्यात यावा, यासाठी खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजेंसह मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा देखील दिला होता.
११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली होती यानंतर विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लवकरात लवकर यासंदर्भात घोषणा करावी अशी मागणी जोर धरत होती. 1 नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरला दुय्यम सेवा अराजपत्रित ‘गट ब’ची परीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षांसाठी एकूण ४ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज जाहीर केले आहे. तर, परीक्षांच्या सुधारित तारखेबद्दल कोणताही खुलासा आयोगाने केलेला नाही.