एमएचटी सीईटी परीक्षा १६ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता १५ मार्चपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.

प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग आणि कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी ही सामाईक प्रवेश परीक्षा १६ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक, माहिती पुस्तिका, अर्ज कसा भरायचा, यासंदर्भात संपूर्ण माहिती प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे.

या परीक्षेसाठी आतापर्यंत सात लाख १२ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सीईटी सेलने अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पाचशे रुपये अतिरिक्त विलंब शुल्कासह १५ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. एमएचटी सीईटी परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी परीक्षा देण्याच्या संधीपासून वंचित राहू नयेत, म्हणून विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

Protected Content