यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथे सुरू असलेल्या श्री महादेव व श्री हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित श्रीराम कथा सप्ताहात पाचव्या दिवशी ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर यांनी जीवनातील संघर्ष, कुटुंबमूल्ये आणि नैतिकतेवर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वामुळे उपस्थित हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले असून रामकथेच्या माध्यमातून त्यांनी समाजाला महत्त्वपूर्ण संदेश दिला.
आपले जीवन हे संघर्षासाठीच आहे आणि त्या संघर्षातूनच माणसाने पुढे जाण्याचा मार्ग शोधला पाहिजे, असे प्रतिपादन समाधान महाराजांनी यावेळी केले. रामायणातील सीता स्वयंवर प्रसंगाचा दाखला देत त्यांनी जनक राजांच्या मनःस्थितीचे अत्यंत जिवंत वर्णन केले. जीवनातील संकटे कधीही पूर्णपणे संपत नाहीत, मात्र त्यातून मार्ग काढणे हेच खरे जीवनाचे तत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. मुलीच्या लग्नाच्या प्रसंगी वडिलांची भावना किती नाजूक असते याचे हृदयस्पर्शी उदाहरण देत त्यांनी कुटुंबातील नातेसंबंधांचे महत्त्व अधोरेखित केले.

मुलांनी आई-वडिलांच्या भावना दुखावू नयेत, त्यांच्या विरोधात जाऊ नये, असे आवाहन करताना त्यांनी विशेषतः मुलींना घर सोडून जाण्यापासून परावृत्त होण्याचा सल्ला दिला. प्रत्येक वडिलांची इच्छा आपल्या मुलीचे कन्यादान आपल्या हातून व्हावे आणि तिचा संसार सुखाचा व्हावा अशीच असते, असे सांगताना त्यांनी उपस्थितांना भावनिक केले. तसेच, दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचेही त्यांनी ठामपणे आवाहन केले. गावातील काही तरुणांनी जरी हे व्यसन सोडले तरी रामकथेचे खरे सार्थक होईल, असे त्यांनी नमूद केले.
रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून ते एक कुटुंब आहे, जे जगण्याची दिशा दाखवते, असे सांगत त्यांनी गरिबीत जन्माला येणे चुकीचे नाही, मात्र त्यातच अडकून राहणे चुकीचे आहे, असे स्पष्ट केले. संघर्षातून प्रगती करण्याचे आवाहन त्यांनी भाविकांना केले. त्यांच्या कथेतून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वनवासाचा सजीव देखावा सादर करण्यात आला, ज्यामुळे वातावरण अधिकच भावपूर्ण झाले.
दरम्यान, दिनांक १९ रोजी सीता शोध, लंका दहन आणि रावण वध यांचे सजीव देखावे सादर करण्यात येणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दहिगाव मित्र मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.



