जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरीविठ्ठल नगरमधील आठवडे बाजारपट्टामध्ये बाजार करण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्योती भानुदास कापुरे (वय-४९, रा. कोठारी नगर, जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान दर मंगळवारी हरीविठ्ठल नगर येथे आठवडे बाजार भरत असतो. या अनुषंगाने ज्योती कापुरे ह्या मंगळवारी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी मंगळसूत्राचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सोमवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहे.