यावल प्रतिनिधी । शहरातील कोर्ट रस्त्यावर मुख्य बाजारपेठेतील बाजीराव काशिदास कवडीवाले या सोने चांदीच्या सराफा दुकानावरील दरोडाप्रकरणी आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौथ्या मुख्य संशयित आरोपीला पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे फैजपूरच्या जंगलातून ताब्यात घेतले आहे.
मुकेश प्रकाश भालेराव ( रा. बोरावल बुद्रुक, ता. यावल ह. मु.तापी काठ स्मशानभूमीजवळ, भुसावळ) असे ताब्यात घेतलेल्या चौथ्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, याच गुन्ह्यातील काल शुक्रवारी तिसरा आरोपी यश विजय अडकमोल (22, रा.बोरावल गेट, यावल) अटक केल्यानंतर आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्या. एम.एस.बनचरे यांनी २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत वृत्त असे की, यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारातील व्यवसायीक बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात दुकान मालक तथा शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले हे ७ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून सुमारे १२ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने घेवुन पळाले होते. याप्रसंगी काही धाडसी युवकांनी त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला तरी देखील ते दरोडेखोर आपल्या कडील पल्सर या मोटरसायकलने पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे बुधवारी १४ जुलै रोजी कांदीवलीतून पहिला संशयित निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड ( मूळ रा. रामनगर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद, ह्ल्ली रा. भामरेकर नगर, मस्जिद गल्ली, कांदिवली ( पूर्व), मुंबई ), गुरूवारी १५ जुलै रोजी चंद्रकांत उर्फ विक्की लोणारी (रा. भुसावळ) तर शुक्रवारी १६ जुलै रोजी यश विजय अडकमोल ( रा. बोरावल गेट, यावल) प्रमाणे अटक केली होती. आज बोरावल बुद्रुक ता. यावल येथील संशयित मुकेश प्रकाश भालेराव यांस एलसीबीच्या पथकाने फैजपूर जंगलातून अटक केली.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचे नेतृत्वात शरीफ काझी, प्रदीप पाटील, युनुस शेख, विनोद पाटील, रणजीत जाधव, किशोर राठोड, रमेश जाधव, अशोक पाटील या पथकाने मुकेश भालेराव यास अटक केली. दरम्यान मुकेश भालेराव या संशयिताने तापी नदीकिनारी असलेल्या पुरातन हनुमान मंदिराजवळून काही दागिने काढून दिले आहे. दरोडेखोरांनी या गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी गाडी सोमवारी १२ जुलै रोजी यावल व रावेर पोलिसांना तालुक्यातील अंजाळे शिवारातील तापी नदीच्या खोऱ्यातून आढळून आलेली आहे. सराफा दुकानावरील टाकलेल्या दरोड्यातील आतापर्यंत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.